शनिवार, 12 मई 2007

अस्तित्व - १

ही कहाणी आहे माझ्या जुन्या मित्राची - चिंतामणी विनायक नांदेडकर त्याचं नाव!
कहाणी कसली? त्याच्या आयुष्याची सत्यकथाच! आणि ती मी सांगतोय - अधिकार नसताना - त्याला न विचारता!
त्याबद्दल तो मला माफ करेल अशी आशा आहे.
+++++++++++++++++++++++++++++++


माणसाचं आयुष्य म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडला आणि अनेकांनी त्याची आपापल्या परीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काही विशिष्ट वेळी कांही विशिष्ट उत्तरं आवडतात, समजतात, पटतात, आपली वाटतात. काही वेळी मात्र तीच उत्तरं चुकीची वाटतात, इतकंच काय पण घृणास्पद वाटतात.
पण कधीकधी माणसाच्या आयुष्यात घडणारे असेही प्रसंग दिसतात की या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव (असेल तर) देऊ शकेल काय? असा प्रश्न पडतो. आणि मग असे प्रसंग पाहून माझ्या विज्ञानवादी मनाला 'प्रत्येक घटनेला त्याअगोदर घडलेली घटना कारणीभूत असते' हे विधान पटेनासं होतं.
चिंतामणीच्या आयुष्यात असंच काही विलक्षण घडावं याला अगोदर घडलेल्या अनेक साध्या-साध्या घटना जबाबदार आहेत हे कोणी सिद्ध करेल! पण अशा साध्या-साध्या घटना तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. मग फक्त चिंतामणीलाच त्याच्या आयुष्यात अशा प्रचंड उलथापालथीला तोंड का द्यावं लागलं / लागतंय? या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही प्रमेयानं सिद्ध करता येणार नाही.
म्हणूनच आज् माझ्यातला दैववादी माझ्यातल्या विज्ञानवाद्याला वेडावून दाखवू शकतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++
अनंत कालप्रवाहातला एक बिंदू तरी असेल का माझे हे आयुष्य?